मुंबई - श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांचा अभिनंदन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, कृपाशंकर सिंह स्वामी परमात्मानंद सरस्वतीजी महाराज देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला ( Devendra Fadnavis Jay Shri Ram Slogan ) आहे.
या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, आज सर्व संतांचे आशीर्वाद मिळाले हे माझे भाग्य आहे. आपल्या संस्कृतीने नेहमीच धर्माचा आचरणाशी संबंध जोडला आहे. धर्मसत्तेचे महत्त्व आपण नेहमीच पाहिले आहे. आज आपण विचारांची शुद्धता हरवून बसल्याने यातूनच ती परत आणण्याचे काम केले जाते.
सभेचा मुख्य केंद्रबिंदू हिंदुत्वाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा होती. चर्चेत सहभागी मोठ्या हिंदू विद्वानांनी आणि आचार्यांनी सभेत सहभागी असलेल्या सर्व संतांसमोर आपले म्हणणे मांडले.
सभेला देश-विदेशातील अनेक ऋषी, संत, शिक्षक, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत प्रामुख्याने देशाची सद्यस्थिती आणि सर्व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यासोबतच सर्व साधू-संतांनीही सभेतून आपले विचार मांडले. श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी समान नागरिकत्व कायदा आणण्याच्या तसेच मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या राज ठाकरेंच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे.