पुणे - १०० कोटींच्या वसुली प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. या नंतर महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
जप्तीचे आदेश असलेली संपत्ती -
- जरंडेश्वर साखर कारखाना- अंदाजित किंमत ६०० कोटी
- दक्षिण दिल्लीतील फ्लॅट - २० कोटी
- पार्थ पवार निर्मल ऑफिस - २५ कोटी
- निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट - २५० कोटी
- महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी - जवळपास ५०० कोटी
घाबरण्याचं कारण नाही -अजित पवार
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी तसेच त्यांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाच्यावतीने दुसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरू आहे. पाहुणे वेगवेगळ्या घरी आहेत. त्यांचे काम सुरू आहे. त्यांचे काम झाल्यावर मी प्रतिक्रिया देईल. आयकर विभागाच्या वतीने अजूनही चौकशी सुरू आहे. ती चौकशी पूर्ण झाल्यावर मी माझी भूमिका मांडणार आहे. नियमाने जे काही असेल ते जनतेच्या समोर येईल त्यात घाबरायचं काहीही कारण नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आयकर छाप्यांवर शरद पवार काय म्हणाले...
उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा, याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे.
हेही वाचा - माझ्या जावायाच्या घरी कोणाताही गांजा सापडला नाही; नवाब मलिकांचे फडणविसांना प्रत्युत्तर