मुंबई : भांडूप येथील सनराईज हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना अलिकडेच समोर आली आहे. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. यानंतर शहरातील सर्व खासगी, पालिका तसेच सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून त्याचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी अग्निशमन दलाला दिले आहेत.
अग्नितांडवाची महापालिकेकडून दखल
भांडूपमधील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या अग्नितांडवात मॉलमधील सनराईज रुग्णालयातील 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निसुरक्षा त्रुटींमुळे ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या बैठकीतही या घटनेवरुन सदस्यांनी पालिका प्रशासनास लक्ष्य केले आहे. भांडूपमधील अग्नितांडवाच्या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने सर्व रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
पालिकेने याची गंभीर दखल घेत शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्तांनी अग्निशमन दलास त्याबाबत निर्देश दिले आहेत. अग्निशमन दलाकडून केल्या जाणाऱ्या ऑडिटमध्ये ज्या रुग्णालयात त्रुटी आढळलतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी १५ दिवसांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.