मुंबई - कोरोना विषाणू विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनावर लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्रात आल्यावर ती सुरक्षित रहावी अथवा ती चोरीला जाऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी लसीचा साठा ठेवण्यात येणार आहे, त्याठिकाणी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसंख्येच्या प्रमाणात लस कमी -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेले नऊ महिने राज्य सरकार, मुंबई महापालिका, आरोग्य विभाग कोरोनाला रोखण्यासाठी परिश्रम घेत आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईमधील कोरोना आटोक्यात येत आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोना विषाणूवरील दोन लशींना परवानगी दिली आहे. मुंबईची लोकसंख्या २ कोटी असून पालिकेच्या कांजूर येथील कोल्डस्टोरेज येथे १ कोटी लशी साठवता येणे शक्य आहे. तसेच एफ साऊथ येथे १० लाख लशी साठवता येणार आहेत.
लस चोरी होण्याची शक्यता -
मुंबईची लोकसंख्या आणि उपलब्ध लसीचा साठा पाहता लसीकरण टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. पालिकेने लसीकरणाचा प्राधान्यक्रमही ठरवला आहे. लस ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्याप्रमाणे ती लस कोरोना योद्धे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामान्य नागरिक यांना देण्यात येणार आहे. इतरांनाही लस शेवटच्या टप्पात दिली जाणार आहे. यामुळे लस चोरी होण्याची शक्यता असल्याने कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. लसीकरण केंद्रावर लस नेताना पोलीस बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - श्रीलंकेत पोहोचला इंग्लंडचा संघ... मोईन अलीला झाली कोरोनाची लागण