मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशनने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स पाठवला आहे. ( Colaba Police Station Summons to Khadse ) त्यांना आज गुरूवार (दि. 7 एप्रिल)रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी त्यांना आज समन्स जारी केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मार्च महिन्यात दोन वेळा चौकशी - फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आरोप होते की त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केला असल्याचा आरोप आहे. (Colaba Police Station Summons) याप्रकरणात रश्मी शुक्ला यांची मार्च महिन्यात दोन वेळा चौकशी देखील करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ? - राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन यामध्ये टॅप करण्यात आला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेत्यांचे फोन टॅप का केले ? - जून (2019)मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु, असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
एफआयआर रद्द करण्याची मागणी - रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा - Nilesh Cabral On Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल परवडत नसेल तर इलेक्ट्रिक गाड्या घ्या -निलेश काब्राल