मुंबई - कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवरून नाराज झालेल्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर कांग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक बैठक बोलावली आहे. संबंधित बैठकीत १७ पक्ष सहभागी होणार असून सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत तर राष्ट्रवादीकडून शरद पवार,अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. केंद्र सरकारने नुकतेच 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजद्वारे गरीबांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तसेच जगातील अनेक अर्थतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी गरिबांना थेट मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सरकारने कर्जरुपी पैसे दिल्याचे चित्र आहे. राहुल गांधी यांंनी देखील गरीबांना कर्जाऐवजी थेट पैसे देण्याच आवाहन केले होते. यामुळे गरिबांची परिस्थिती आणखी खालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडणाऱ्या बैठकीला शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीची देखील उपस्थिती असणार आहे. या बैठकीत शेतकरी, कामगार कायद्यात केलेला बदल यावर चर्चा होणार आहे.