मुंबई - कोरोनासोबत आपण सर्वजण मागील 3 महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला आहे. तरीही मृत्यू दर वाढत आहे, हे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यात वाढ होत आहे. रुग्णांना शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे. या कामात अजिबात ढिलाई नको. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्या दिले. आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे झालेल्या या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.
मुंबई येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण स्थापन केला. त्याचा चांगला उपयोग झाला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे. याचे कारण रुग्ण संख्या वाढत आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या फोर्समध्ये जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्ससोबत कायम संपर्क असावा, असेही सांगितले.
आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधे याबाबत विविध सूचना येत असतात. त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत. हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत, अशा सुचना असताना काही ठिकाणी 72 तास लागत असतील तर ही गंभीर बाब आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात ढिलाई झाली नाही पाहिजे, अशा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
हेही वाचा... विशेष मुलाखत : कोरोनावर सरकारचे उपाय म्हणजे पॅकेज नव्हे..निव्वळ 'पॅकेजिंग', पी. साईनाथ यांची टीका
ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत. काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत. कनिष्ट डॉक्टर कोविड-19 ची जबाबदारी सांभाळत आहेत, असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सना थेट कोविड उपचार करायचे नसतील, तर ते रुग्णालयात उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक, स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांसाठी मार्गदर्शन करणे त्यांना सहज शक्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सुचवले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर आजारांमध्येही वाढ होऊ शकते. अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिक्लब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी, असे टोपेंनी सुचवले.
आजच्या या बैठकीत मीरा भाईंदर, पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या आणि महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस 21.3 वरून 23.1 झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 50.4 असून देशाचा रिकव्हरी रेट 53.8 इतका असल्याचे सांगितले. तसेच मृत्यू दर 3.7 वरून 4.8 टक्के झाल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा... गोड मिरची, काटेरी काकडी, जांभळी हळद पाहलीय का? बीडच्या बीजकन्येने जपलाय अनोखा ठेवा
रुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून नियमित समायोजन करावे आणि माहिती अद्ययावत करत राहावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यावेळी दिले. जिथे प्रत्येक रुग्णांचे 10 पेक्षा कमी संपर्क शोधण्यात येतात, तिथे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याचे ते म्हणाले. एखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून तेथील रहिवाशांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करत राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.