मुंबई - बीकेसी मैदानावर शक्तिप्रदर्शन करत दणदणीत सभा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची आज (रविवारी) वर्षा निवासस्थानी बैठक ( Meeting Shiv Sena district chief at Varsha residence Mumbai ) घेतली. दरम्यान, शिवसेनेचे काम उत्तम सुरू असून प्रत्येक गावात शिवसेना शाखा वाढवण्यासाठी प्रयत्न करा. तसेच पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील अशा स्वरूपाचे काम करा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) यांनी दिल्या आहेत.
राज्यात हिंदुत्व आणि नव हिंदुत्वाच्या वाद शिगेला पोहोचला आहे. भाजपा, मनसेकडून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने टार्गेट केले जात होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या सर्व प्रश्नांना शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्यभरातून शिवसैनिक सभेला आले होते. राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची आज उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक घेत शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात शिवसेना नंबर वन करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची बैठक बोलावण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही आगामी निवडणुका होत असून त्यानुषंगानेही शिवसेनेची बांधणी करण्यात येणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीला अजून अडिच वर्ष बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आता पासूनच संघटनेच्या बळकटीवर लक्ष दिल्याचे बोलले जाते.
गाव तिथे शिवसेना शाखा : राज्यात शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे लोकांच्या आपल्याकडे खूप अपेक्षा आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी प्रत्येक गावात शाखा तयार करा. शाखेत नेहमी बसा. यावेळी समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकांच्या समस्या सोडवा. लोकांशी विनम्रपणे संवाद साधा. त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या. राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. लोकांचा अपेक्षाभंग होता कामा नये, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. हे काम करत असताना पुढील २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, या उद्देशाने कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
'विरोधकांच्या सडेतोड उत्तर द्या' : शिवसेनेवर विरोधकांकडून सतत आरोप होत आहेत. भाजपाकडून सध्या उठसुठ आरोपांची राळ उडवली जात आहेत. विरोधकांच्या अशा आरोपांना सडेतोड उत्तर कसे द्यायचे याची तयारी करा, असे निर्देश बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले.