मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुरात आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने ज्येष्ठ विधिज्ञांसोबत मराठा आरक्षणप्रश्नी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विधिज्ञ यांच्यासोबत चर्चा करून मराठा आरक्षणप्रश्नी आजच मुख्यमंत्री ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
वर्षा निवासस्थानाबाहेर आढावा आज सकाळी मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनितीबाबत चर्चा केली. राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाची तीव्र आंदोलने सुरू आहे. राज्य सरकार पुनर्विचार याचिकेसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये मुख्य चर्चा होईल. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार घटनापीठ तातडीने स्थापन व्हावे, तसेच पुनर्विचार याचिका दाखल करून आधीच या आरक्षणावरील स्थगिती उठवावी, अशी राज्य सरकारची मागणी असणार आहे.न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेपर्यंत मराठा समाजाचे आंदोलन शांत करण्यासाठी तातडीने अध्यादेश देखील जारी करण्याबाबत सरकार विचार करत आहे. कायद्याच्या कसोटीवर कोणता निर्णय टिकेल आणि मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलने थांबतील, या दृष्टीने राज्य सरकारमधील सर्व नेते आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - मराठा आक्रमक... सोलापूर जिल्हा बंदला उस्फुर्त प्रतिसाद, माढ्यात टायर पेटवून घोषणाबाजी