मुंबई - गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) नवीन वर्षाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे विकासाची गुढी उभारणार आहेत. एकाच दिवशी विविध ठिकाणी ते जनतेच्या सेवेसंदर्भात उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम करणार आहेत. विशेष करून मागची दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेले, त्यादरम्यान मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत? मंत्रालयात येत नाहीत? मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होत नाहीत? असे विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते. इतकंच नाही तर मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कारभार इतर कोणाकडे तरी सोपवावा, या पद्धतीची मागणीसुद्धा भाजपकडून करण्यात आली होती. आता या सर्वांना उत्तर म्हणून उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत विविध विकासकामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करून विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहेत.
रखडलेली कामे पूर्णत्वास नेऊन उद्घाटन - मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे विविध विकास कामे रखडल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत होती. त्याचबरोबर आत्ताच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या तब्येती वरून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु या सर्वांना एकच उत्तर असं सांगत उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मुंबईतील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे ते विरोधकांना सडेतोड उत्तर देतील. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड उठली होती. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत महाविकास आघाडी केल्याबद्दल सुद्धा भाजप कडून वारंवार मुख्यमंत्री यांना टार्गेट केले जात आहे.
मेट्रो 2 ए व मेट्रो 7 प्रकल्पाचे उद्घाटन - आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मेट्रो 2 ए हा प्रकल्प तसेच मेट्रो 7 या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगाने करण्यासाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गिका प्रकल्प एमएमआरडीए ने हाती घेतला आहे. मेट्रो 2 अंतर्गत दहिसर ते डी एन नगर मेट्रो दोन मार्गिका बांधली आहे. त्याच वेळी दहिसर ते अंधेरी अशी मेट्रो 7 मालकीचे ही बांधकाम झाले आहे. या दोन्ही मार्गिका याआधीच वाहतुक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर तांत्रिक कारणामुळे प्रकल्पास विलंब झाला. यामधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत आहे.
मुख्यमंत्री या प्रकल्पाची गुढी उभारत असताना आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत आहेत असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. गेल्या वर्षी 31 मे रोजी या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर अपुऱ्या सुविधेनिशी मेट्रो सुरू करणारे ठाकरे सरकार म्हणजे आयत्या उभारलेल्या गुढीची पूजा करण्यासाठी उपटलेला अनाहूत यजमान आहे, अशी बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. परंतु अशा पद्धतीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विकासाची गुढी उभारणार आहेत.
मराठी भाषा भवन जागेचे भूमिपूजन - मुंबई, गिरगाव चौपाटी समोर दिमाखदार मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा मध्यंतरी करण्यात आली होती. त्याला मूर्तस्वरूप देण्यात येत असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मरिन ड्राईव्ह येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन चर्नी रोडला समुद्रकिनारी हे भाषा भवन उभे राहणार आहे. यासाठी जागेची लांबी अंदाजे 54 मीटर आणि रुंदी सरासरी 32 मीटर असेल. मराठी भाषा भवन इमारत तळमजला अधिक सात मजले असणार आहेत. इमारतीमध्ये २०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह असणार आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे. प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र 6,583 चौरस मीटर एवढे असणार आहे.
जीएसटी भवन चे भूमिपूजन - प्रशासकीय स्तरावर महत्त्वाची असलेल्या नवीन जीएसटी भवन चे भूमिपूजन सुद्धा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाला हक्काची जागा भेटावी यासाठी वडाला येथे 38,171.58 चौरस मीटर भूखंडावर जीएसटी भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून या प्रकल्पाचे भूमिपूजन सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासाठी ) 1810 कोटी रुपय खर्च करून चार इमारती बांधणार आहेत. गुढीपाडव्यापासून बांधकामास सुरुवात करून पुढील तीन महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाला असून वित्त विभागाने कर वसुलीसाठी वस्तू आणि सेवा कर विभागाची स्थापना केली आहे. या विभागासाठी स्वतंत्र कार्यालय नाही. स्वतंत्र कार्याची गरज लक्षात घेऊन सरकारने जीएसटी भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
गृह विभागाच्या तीन सेवांचे लोकार्पण! - यासोबतच गृह विभागाच्या तीन सेवांचे लोकार्पण ही गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते होणार आहे. त्यामध्ये 112 क्रमांकांची हेल्पलाइन असणार आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली असं त्याचं नाव आहे. या यंत्रणेमुळे मदत हवी असलेल्या नागरिकांना शेषतः महिला, लहान मुलं, वृद्ध यांनी दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. शहरी भागात 10 ते 15 मिनिटात व ग्रामीण भागात 15 ते 20 मिनिटांमध्ये नागरिकांना यावर प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
दुसरी सेवा ही गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रणालीची मदत घेणार आहे. सुमारे सहा लाख गुन्हेगारांचे छायाचित्रे, बोटाचे ठसे इत्यादीची एकत्रित माहिती प्रणाली मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. तिसरी सेवा ही महिला व बालकांना होणारे सायबर गुन्हे प्रतिबंधक प्रणाली आहे. या प्रकल्पांतर्गत इंटरनेटवरील फसवणूक, वैवाहिक विषयक संकेतस्थळांवरील फसवणूक, ओळख चोरी, छायाचित्रांमध्ये फेरबदल, बँकांना संदर्भातील फसवणूक, बालक पोनोग्राफि, सायबर बूल्लिंग, ऑनलाइन गेमिंग, खोटी माहिती देणारे संकेत स्थले, सायबर मानहानी याची माहिती यापासून प्रतिबंधक उपाय आदींसाठी ही प्रणाली काम करणार आहे.
अडीच वर्षाच्या सरकारचा कार्यकाल या मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री स्वतः भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम करणार आहेत. विशेष म्हणजे येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बघता विरोधकांसाठी ही ही उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रम धडकी भरवणारे आहेत.