मुंबई - मेट्रो कारशेडचा वाद काही केल्या थांबत नसल्याने अखेर कारशेडसाठी इतर जागांची चाचपणी करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीए प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी वापरण्यात येणारी जागा मेट्रोच्या कारशेडसाठी वापरता येईल का याची पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कांजूरमार्गाच्या कामात केंद्राने मोडता घातल्याने मोदींच्या बुलेट ट्रेन शह देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
कारशेडचा वाद -
मेट्रोचे कारशेड गोरेगाव आरे येथे उभारले जाणार होते. आरेचे जंगल वाचवण्यासाठी कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारशेडसाठी 120 एकर जागा दिली होती. या जागेवर सॉईल टेस्टिंगचे काम सुरू करतानाच केंद्र सरकारच्या मीठ आयुक्त कार्यालयाने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला होता. यासाठी न्यायालयातही याचिका दाखल झाल्यावर कांजूर येथील राज्य सरकारच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली. या दृष्टीने आता एमएमएमआरडीएला मेट्रोसाठी बिकेसी येथील जागेसह इतर जागांची चाचपणी करून मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यावा लागणार आहे.
नव्या जागेचा शोध सुरू -
कोर्टाने कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने मेट्रोचे कारशेड कुठे उभारली जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेट्रोची कारशेड बुलेट ट्रेनसाठी बनवल्या जाणाऱ्या कारशेडची जागा ताब्यात घ्यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. या जागेची पाहणीही एमएमआरडीए करणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.