मुंबई - मतांच्या स्वार्थी राजकारणासाठी पाहिजे ती मुलगी पळवून आणतो, अशी वल्गना व सैनिकांविषयी वल्गना करणाऱ्यांसारखे ढोंगी जगात दुसरे कोणीही नाहीत. राजकारणात हरलो तर चालेल पण महिलांचा अपमान करणारा एकही नतदृष्ट पक्षात ठेवणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांचा उपमर्द करणाऱ्या प्रवृत्तीचा कठोर शब्दात समाचार घेतला. जागतिक महिला दिन दरवर्षी येईल पण नुसत्या चर्चा नको. पक्ष राजकारणा पलीकडे जाऊन चांगला समाज घडवण्यासाठी नतदृष्टांचा माज उतरवण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची असून, महिलांचा आदर सन्मान प्रामाणिकपणे करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केले.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाबाबत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव आणला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या वादग्रस्त आमदारांचे थेट नाव न घेता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या महिलांविषयीच्या वादग्रस्त वर्तनावर कठोर शब्दात टीका केली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचे वैषम्य वाटते की, आपला महाराष्ट्र मानतो तसे वागत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी हुंडा पद्धतीवर कोरडे ओढले होते. हुंडा घेणाऱ्या एका लग्नात गाढव घेऊन, गाढवाच्या झुलीवर हुंडेबाज गधडा लग्नाला निघाला अशी त्यांनी पाटी लावली होती. त्यामुळे लग्नात गोंधळ उडाला होता. जुनाट चालीरितींच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे कर्मंठाच्या विरोधाला ठाकरे कुटुंबाला सामोरे जावे लागले होते', अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितली. चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, महिलांवरील अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार हे दुर्दैवी आहेत. आरोपींना पिंजऱ्यात उभे करून त्यांना शिक्षा देण्याचे काम सरकार करेल. पण महिलांच्या आदर सन्मानासाठी आपण काय करतोय याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
दिल्लीत निर्भया कांडातील आरोपींनी सात वर्षांनंतर व शिक्षा झाल्यानंतर फाशी दिली जात नाही. तारीख पे तारीख सुरू असून, यामुळे आरोपींना जरब कशी बसणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. देशाच्या रक्षणासाठी महिला सीमेवर जात आहेत. पण, त्या माता भगिनींचे संरक्षण करण्यात आपण अपुरे ठरत आहोत. नामर्दाचा समाज आपल्याला मान्य आहे काय. सरकार या प्रश्नाची जबाबदारी टाळत नाही. पण, समाजातील संस्कार हा विषय संपत चालला आहे काय, याचा गंभीर विचार व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
मला झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. पण, जनता असुरक्षित असेल तर माझ्या सुरक्षेला काय अर्थ आहे. माझ्या महाराष्ट्राने देशाला संस्कृती, संस्कार आणि मोठे समाजसुधारक दिले. छत्रपतींचे वंशज आम्ही स्वतला समजतो. पण आईशी, मुलीशी, पत्नीशी चांगले वागत नसेल तर महिला दिनाऐवजी त्या दीन का झाल्या, हा प्रश्न आहे. महिलांना सदैव आदराने वागवू असा संकल्प करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी चर्चा संपल्यावर उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी करत इतर सदस्यांना बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, उपसभापतींनी प्रस्तावावरील चर्चा संपली असल्याचे जाहीर केले. चुकीच्या पद्धतीने कामकाज चालू असल्याचा विरोधकांनी आरोप करत गोंधळ घातला. शेवटी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
हेही वाचा -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उरलेल्या सत्रासाठी काँग्रेसचे सात खासदार निलंबित
महिला दिन विशेष : कर्तृत्ववान एकता कपूरचा इंटर्नशीप ते पद्मश्रीपर्यंतचा संघर्षमय प्रवास
VIDEO : महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद, आश्चर्यकारकरित्या वाचला जीव..