मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटमुळे(Omicron Variant) राज्यात दक्षता घेण्यात यावी याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
निर्बंध होणार कडक
'ओमिक्रॉन' व्हॅरिएंट हा आतापर्यंतचा सर्वात घातक विषाणू असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. राज्यात याचा शिरकाव होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून आज होणाऱ्या बैठकीनंतर काही निर्बंध कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्यमंत्र्यांसह अधिकारी, जिल्हाधिकारी राहणार उपस्थित
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री हजर राहणार
मुख्यमंत्री हे शस्त्रक्रियेनंतर अद्यापही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.