मुंबई - मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत असल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातून घेतला. यावेळी साचलेल्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा, तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य व पालिका प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून पावसाचा आढावा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तेथील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मदत कार्य सुरू ठेवा - मुख्यमंत्री
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन, सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून पावसाच्या परिस्थीतीची माहिती घेतली. मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतील पंपींग स्टेशन्स कार्यरत ठेवून साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते पाहावे, तसेच पाणी साचल्यामुळे जेथे वाहतूक कोंडी झाली आहे, ती दूर करावी अशा सूचना देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
हेही वाचा - दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चं नवं रेस्टॉरंट पडलं बंद; पुन्हा जुन्या जागेत व्यवसाय सुरु