मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या पाच परिक्षेत्र मध्ये नव्या सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या 94 पोलीस ठाण्यांमध्ये स्वागत कक्ष व पाच परिक्षेत्र मध्ये पाच नव्या सायबर पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्यांचा बुरखा फाडला-
भारतात नुकतीच कोरोना लस हाती आली असून न दिसणाऱ्या शत्रू सोबत आपण आजही लढतच आहोत. पण सायबर गुन्हेगारीशी लढताना एक पाऊल पुढे टाकून आपण लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी अजिबात अस्वस्थ होण्याचे कारण नाही. कारण मुंबई पोलिसांचा मला नेहमीच अभिमान राहिलेला असून कोणी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सरकार म्हणून पूर्ण ताकतीनिशी तुमच्या पाठीशी उभा राहील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ज्यांनी मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांचा बुरखा आम्ही फाडला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
अमली पदार्थ विरोधी पथकाला बळकट करण्यासाठी प्रयत्न-
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य होऊ शकले नाही. सुशांत सिंग राजपूत यांची केस सध्या सीबीआयकडे आहे. मात्र त्यापुढे काय झालं हे अद्याप कळालेलं नाही. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला आणखीन बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुंबईत राहत असलेल्या नायजेरियन नागरिकांसाठी वेगळे पाऊल उचललं जाईल आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, असं देशमुख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- 72 Republic Day Celebration: राजधानी दिल्लीत राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा