मुंबई - गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे सणवार उत्साहात साजरे करता आले नव्हते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सणवारांवरील निर्बंध हटवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी केली आहे. तसेच गणेश मूर्तींच्या उंची ( Height of Ganesha idols ) वाढवण्याबाबत निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम आणि पारशी सण यामुळे दणक्यात साजरे करता येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडीनिमित्त कायदा व सुव्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना : गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली असून, आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दहीहंडी हे सण उत्साहाने साजरे व्हावेत. हे करताना मंडळांनी समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे. गणेशोत्सव, दही हंडी, मोहर्रम या सणाच्या काळांत राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनांना निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. तसेच गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क, हमी पत्र घेऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. मंडप परवानगीसाठी सातत्याने खेटे घालावे लागतात. त्यामुळे गणेसोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारचे परवानग्या द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. गणेशोत्सव हा सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. मात्र नियम काटेकोरपणे पाळले गेलेच पाहिजेत. नियमांचा अवास्तव बाऊ करू नये, आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने मागे : राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवावी. मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणं तसेच विसर्जन मार्गांवर पुरेशी वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी करताना कोरोना काळात गणेश मूर्तीच्या उंचीवर असलेली बंधने उठवल्याचे स्पष्ट केले. मुंबईत मूर्तीकारांसाठी मूर्तींशाळांसाठी जागा मिळावी, अशी सातत्याने मागणी केली जाते. याची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी जागा निश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात, अशा सूचना दिल्या.
विशेष समितीचे गठन : पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पूरस्कार योजना सुरु करण्यात येईल. धर्मादाय आयुक्तांनी मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी, असे आदेश प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी, असा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दहीहंडी पथकात सर्रास लहान गोविंदाचा समावेश होतो. न्यायालयाच्या आदेशानुसार नवी नियमावली घालून देण्यात आली आहे. त्यानुसार दही हंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई होऊ शकते, असे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
हेही वाचा - BMC Election : ओबीसी आरक्षणामुळे पुन्हा नव्याने लॉटरी, वंचितांना मिळणार पुन्हा एकदा संधी