मुंबई - सेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) चांगले आक्रमक झाले असून राज्यभरात शिवसंवाद यात्रा काढत बंडखोरांचा समाचार घेत आहेत. शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळतो आहे. ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार ( CM Eknath Shinde On Maha Tour ) आहेत. त्यापाठोपाठ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही राज्याचा दौरा करणार असल्याने बंडखोर नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
निष्ठा यात्रेनंतर आता शिव संवाद - शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत हादरा दिला. आमदारांपाठोपाठ खासदार शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षावर दावा सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना भवन आणि मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढल्यानंतर राज्यात 'शिव संवाद' च्या माध्यमातून यात्रा काढत आहेत.
आदित्य ठाकरेंच्या यात्रेला मोठी गर्दी - नुकतेच नाशिक, औरंगाबादमध्ये दौरा करत बंडखोरांचा समाचार घेतला. शिवसैनिकांनीही आदित्य ठाकरेंच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असल्याच्या घोषणा देत आहेत. नाशिकमध्ये सुहास कांदे तर पैठणमध्ये संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरेंच्या यात्रेला मोठी गर्दी झाली. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांच्या डोकेदुखी वाढत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार महाराष्ट्र दौरा - शिवसेनेच्या फुटीर आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत चर्चा करताना, महाराष्ट्र दौरा करावा अशी विनंती केली. मुख्यमंत्री शिंदेनी लवकरच महाराष्ट्र दौरा करून लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करू अशी ग्वाही दिली. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतही मुख्यमंत्री शिंदे आढावा घेणार आहेत. दौऱ्याच्या नियोजन अद्याप झालेले नाही. मात्र १ ऑगस्टनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे समजते.
उद्धव ठाकरेही दौऱ्यावर - मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी राज्यात फिरले नाही, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. मात्र, मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोना सारख्या महा विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात वाढला. राज्यभरात यामुळे लॉकडाऊन होता. तब्बल दोन वर्ष कोरोनाचा संसर्ग राहिल्याने कोरोनाचे निर्बंध कायम होते. अशातच विविध नैसर्गिक आपत्तीला मुख्यमंत्री ठाकरे यांना तोंड द्यावे लागले. कोरोनाची लाट ओसरताच तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्बंध शिथिल केले. जनजीवन पूर्ववत झाले असतानाच एकनाथ शिंदे यांनी बंड केला. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानंतर हा दौरा होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात उद्धव ठाकरे काय संबोधन करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Actress Arpita Mukherjee : अभिनेत्री अर्पिता मुखर्जी चर्चेत; पाहा हटके फोटो