मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला निशाणी 'ढाल तलवार' दिली आहे. तर काल एकनाथ शिंदे गटाला "बाळासाहेबांची शिवसेना" हे नाव देण्यात आलं होतं. यासोबतच उद्धव ठाकरे गटाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव देण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचे पारंपारिक निशाणी असलेले धनुष्यबाण गोठल्याने शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधकांमुळेच शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी गोठली, असा आरोप नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया - केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आमच्याकडून सर्व कागदपत्रे वेळेवर देण्यात आली. मात्र उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने प्रतिज्ञापत्र देण्यास विलंब करण्यात आला. प्रतिज्ञापत्र देण्यासाठी चार वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ मागितल्यानंतर ही प्रतिज्ञापत्र देण्यात आली नव्हती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता निर्णय घ्यावा लागला. पोट निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीनंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव आपल्याच गटाला मिळेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
नाना पाटेकरांनी घेतली मुलाखत - ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केले. रक्त आटवले, घाम गाळला आणि आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष केले. कधीही कुठंही घरादाराचा विचार केला नाही. एवढे करुनही जेव्हा कुठे चुकीचे घडू लागले. पक्षाच्या प्रमुखांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात. पण पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन ते घ्यायचे असतात. पक्षाचे नुकसान होत आहे आणि ते वाचवण्यासाठी जर आम्ही हा निर्णय घेतला असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ही मुलाखत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली आहे.
शिंदे गटाला मिळाले नवे चिन्ह - शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सूर्य या चिन्हाला आम्ही पहिली पसंती दिली होती. परंतु, निवडणूक आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं ढाल-तलवार हे चिन्ह मराठमोळी निशाणी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.