मुंबई राज्यात सत्तेवर आल्यापासून गतिमान कारभार सुरू आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यपूर्ण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून केंद्राकडून सहकार्य मिळत आहे. देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राज्यातील नागरिकांना त्यांनी अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पूरस्थिती अतिवृष्टीचा २८ जिल्ह्यांना फटका बसला आहे. तातडीने पंचनामे करून युद्धपातळीवर मदत देत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
भारताच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. ही संधी मिळाली माझे भाग्य समजतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्यांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. गेली अडीच वर्षे कोविडचे संकट होते. अद्यापही हे संकट गेलेले नाही. धार्मिक सण काळजी, खबरदारी घेऊन साजरा करू या, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी राज्यातील जनतेला केले. तसेच, देशाचा अमृतमहोत्सवी वर्ष यंदा तिरंग्यानी न्हाहून गेला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
पावसाचा २८ जिल्ह्यांना फटका राज्यात सरकार सत्तेवर आल्यापासून गतिमान कारभाराला प्राधान्य दिले आहे. पहिल्या दिवसापासून सरकार सर्व सामान्यांसाठी झटत आहे. पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे वेगाने सुरू आहेत. तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहे. मुसळधार पावसामुळे २८ जिल्ह्यांना फटका बसला आहे. १५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे १५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या नागरिकांची सर्व काळजी घेतली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यातून नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अमृत संस्थेला उभारी ओबीसी आरक्षण मिळवून दिले आहे. मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसींकरिता बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळाले आहे. दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत संस्थेला उभारी दिली जात आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उद्योगासाठी सरकारचे प्रयत्न राज्यात स्टार्टअपला प्राधान्य दिले आहे. सरकारकडून याला पाठबळ दिले जात आहे. नवीन उद्योजक तयार होतील याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहेत. नाविन्यपूर्ण योजना आणि त्यातून उद्योग उभारणीसाठी सरकारकडून मदत दिली जाईल. सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सहकार्य मिळत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यपूर्ण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनवण्याचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच, योजनांची अंमलबजावणीची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गुरुजी उपक्रम राज्य सरकार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. सरकारने आमचे गुरुजी उपक्रम हाती घेतला आहे. वर्गामध्ये शिक्षकाचे छायाचित्र आणि माहिती दिली जाईल. विद्यार्थी आणि पालकांना शिक्षकांची यातून ओळख होईल. तसेच राज्यात यापुढे कोणत्याही शाळेत एक शिक्षक राहणार नाही, असे नियोजन आखल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जनतेची कामे सुरूच येत्या काही दिवसांत समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होईल. नागपूर - मुंबई दरम्यानचा हा महामार्ग विकासाचा महामार्ग ठरेल. पोलिसांच्या घरासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. संबंधित यंत्रणांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. जनतेच्या हिताची कामे कुठेही थांबली नाहीत. उलट कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पाठबळ देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
बुस्टर डोस मोफत कोविडचे संकटाचे ढग अद्याप सरलेले नाहीत. केंद्र सरकारकडून बुस्टर डोस मोफत दिले जात आहेत. राज्यातील जनतेने सुरक्षेसाठी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.