मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आगामी महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. त्याबरोबरच त्याचबरोबर अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी यावर्षी ५८,२४४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे टार्गेट आहे. त्यामुळे बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीसीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज नक्की मिळेल. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता. त्याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, अनेक ठिकाणी पाऊस कमी पडला असतानाही यंदा २४ लाख मेट्रिक टन पीक वाढल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारने यावर्षीही तुटपुंजी तरतूद केल्याचे विरोधकांनी चर्चेत म्हटले होते. यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी पलटवार करत सांगितले, की आघाडी सरकारने हे स्मारक गांभीर्याने घेतले नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासाठी केंद्रातून सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून राजकारण न करत सर्वांच्या सहकार्याने हे स्मारक उभारले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना केले.
अर्थमंत्री मुनगंटीवारांनी केलेल्या अन्य घोषणा
- २०२४ मधील ऑलिंपिंकमध्ये राज्यातील खेळाडूंचा टक्का वाढावा म्हणून तालुका स्तरावरील स्टेडियमला पाच कोटी रुपये देणार
- संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनियमित मिळत असल्याने तीन महिन्यात यासाठी कायदा तयार करून पैसे दिले जातील.
- माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध योजना राबवण्यात येणार असून यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.
- आमदार निधीसाठी संपूर्ण पाच वर्षासाठी १० कोटी रुपये देण्यात येत असून त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.
- येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रस्ताव द्यावा, त्यानंतर त्याला निधी देण्यात येईल.
- वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करणार