मुंबई - कोरोनामुळं सगळ्याच क्षेत्राला फटका बसला आहे. कोरोनामुळं जगातील प्रत्येक देश हैराण आहे. कोरोनाची एक लाट संपली की दुसरी लाट येते. दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु होते. यामुळं प्रत्येक क्षेत्राचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. कोणत्याही क्षेत्राची भिस्त ही त्याच्या आर्थिक ताकदीवर अधारीत असते. मात्र, कोरोनामुळं सगळ्याच क्षेत्राचं आर्थिक गणित बिघडलं आहे. भारतात दिवाळीनंतर ते पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीपर्यंत लग्न सराईचे दिवस असतात. याच काळात मुहूर्त पाहून अनेक जोडपी विवाह बंधनात अडकतात. याच कालावधीत लग्नसराईमुळं अनेक व्यवसायाला गती मिळत असते. यात फोटोग्राफरपासून ते लग्नपत्रिका छापण्यापर्यंत सर्वांचेच लग्नसराईच्या मोसमात चांगले उत्पन्न होते. मात्र, कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
आमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाला यायचं हं ... असं आग्रहाचं निमंत्रण लग्न पत्रिका देवून केलं जातं. पण कोरोनामुळं लग्न समारंभावर मर्यादा आल्या आणि या मर्यादेमुळं ज्या लग्नपत्रिका हजारांमध्ये छापल्या जायच्या त्या अगदी आता दोन अंकी आकड्यांमध्ये छापल्या जात आहेत. याच संदर्भातला पाहुयात ई टीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...
कोरोनाचा फटका प्रिंटींग व्यवसायाला -
भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला एक वेगळं महत्त्व आहे. जोडपी लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जातात आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतात. नव्या आयुष्याची सुरुवात धुमधडाक्यात केली जाते. नातेवाईक, मित्रमंडळी, आत्पेष्ठ यांना लग्नपत्रिका देऊन लग्नाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं जातं. मात्र, कोरोनामुळं या लग्न समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या. त्यामुळं लग्नपत्रिकेचा व्यवसाय कासवाच्या गतीपेक्षाही मंद चालतो आहे.
वेडिंग कार्ड असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोलंकी सांगतात की, संपूर्ण मुंबईत सुमारे 700 ते 800 लग्न पत्रिकेची दुकानं आहेत. या वेडिंगकार्ड असोसिएशनमध्ये साधारण 3 लाख लोकं काम करत आहेत. कोरोनाच्या काळात हा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. प्रकाश सोलंकी सांगतात की, दिवाळी आणि होळी हे दोन्ही सिझनमध्ये लग्नसराईचे दिवस असतात. मात्र, या दोन्ही वेळेस लॉकडाऊन लागल्यानं परिस्थिती गंभीर आहे. सोलंकी सांगतात की, आमचा सगळ्यात मोठा ग्राहक वर्ग मराठी आहे. मुंबई बाहेरील जिल्ह्यातून येऊन ग्राहक येथे सुमारे तीन ते चार हजार कार्ड छापून घेवून जायचा. मात्र, आता निर्बंधांमुळं हे आम्हाला परवडत नाही. आता फक्त एक ग्राहक 50 कार्डचीच छापून देण्याची मागणी करतो.
ग्राहक फक्त 30 ते 40 कार्ड छापतात -
वेडिंग कार्ड असोसिएशनचे वाईस प्रेसिडेंट प्रवीण कोलतलकर सांगतात की, आमचं असोसिएशनचं कार्यक्षेत्र मुंबईपासून कर्जत, कसारा, विरार, पनवेलपर्यंत आहे. कोरोनाच्या काळात या व्यवसायावर 100 टक्के परिमाण झाला आहे. ग्राहक आता फक्त 30 ते 40 कार्ड छापत आहेत. हे आम्हाला परवडत नाही. मात्र, ग्राहक तुटू नये यासाठी आम्ही फक्त दुकानं सुरु ठेवली आहेत, असं प्रवीण कोलतलकर सांगतात.
प्रिंट्रींग इंटस्ट्रीमध्ये महत्त्वाचा आणखी एक भाग असतो तो म्हणजे लग्नपत्रिका डिझाईन करणं. या क्षेत्रात तब्बल 20 वर्ष काम करणारे शिंदे सांगतात की, डिजीटलमुळं प्रिटिंग व्यवसायाला घरघर लागली होती. कोरोनामुळं त्यात भर पडली आहे. पहिलं आम्ही 100 टक्के काम करत होतो. मात्र, आता अवघं 20 टक्केच काम करत असल्याचं शिंदे सांगतात.
कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
कर्मचारी निलेश तांबे सांगतात, पूर्वी 12 तास काम चालायचं पण आता 4 तास देखील काम चालत नाही. वाहतुकीवर निर्बंध असल्यानं कामावर येता येत नाही. मात्र, स्ट्रगल करुन कामावर यावं लागतं. कामावर नाही आलो तर पगार कसा मिळणार? पगार तुटपुंजा आहे. पोट भरायचं कसं? असा प्रश्न पडला आहे. सरकार सांगतं की घराच्या बाहेर पडू नका. मात्र घराच्या बाहेरच पडलो नाही तर पोट कसं भरणार? हा प्रश्न कर्मचारी व्यक्त करत आहेत.
या प्रिंटींगच्या व्यवसायात अनेक कर्मचारी काम करत आहेत. कर्मचारी विजय सांगतात, आधी 25 हजार घरी न्यायचो आता 4 हजार घेऊन जातो. आता घरच्यांना देखील काम करावं लागत आहे. पैसे मिळत नसल्यामुळं दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जावं लागतं. पूर्वी आम्ही दिव्याला राहत होतो. दिव्याला भाड्याच्या खोलीत राहत होतो. कोरोनामुळं कुटुंब गावी गेलं आहे. घराचं भाडं देणं पवडत नाही त्यामुळं कामावर राहत असल्याचं कर्मचारी विजय सांगतात.