मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे. 12 नोव्हेंबरला अनिल देशमुख यांची कोठडी संपणार आहे. त्यानंतर जर ईडीने पुन्हा कोठडी नाही मागितली किंवा न्यायालयाने त्यांना कोठडी नाही दिली तर अनिल देशमुख यांचा ताबा कॅश फॉर ट्रान्सफर प्रकरणात तपास करत असलेले केंद्रीय अन्वेषण विभागही अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कॅश फॉर ट्रान्सफर प्रकरणात अनिल देशमुख यांच्या कथित भूमिकेबद्दल सीबीआयला चौकशी करायची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. रोख रकमेच्या बदल्यात महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुकूल पदांवर बदल्या झाल्याचा आरोप आहे. बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्यासंबंधित एजन्सीच्या तपासादरम्यान नाव समोर आल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी संतोष शंकर जगताप या कथित मध्यस्थाला सीबीआयने अटक केली होती. काही पोलीस आणि राजकारणी त्याच्या जवळचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
देशमुख 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत -
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती देण्यात आली आहे की, या प्रकरणात आता सीबीआय देखील अनिल देशमुख यांच्या कोठडीची मागणी करू शकते. अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी संपल्यानंतर सीबीआय न्यायालयाकडून माजी गृहमंत्र्यांची कोठडी मागणार आहे. देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने देशमुख यांच्या कोठडीची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुखला 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
अनिल देशमुखांना 1 नोव्हेंबर रोजी ईडीकडून अटक -
1 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख कालपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. त्यांची ईडी कोठडी शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी संपली. त्यामुळे ईडीने त्यांना सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 13 दिवसांची वाढ केली. मात्र न्यायालयाने त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत न ठेवता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याविरोधात ईडीने आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अनिल देशमुख यांच्या कोठडीची ईडीने मागणी केली. ईडीची मागणी मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
अनिल देशमुखांच्या मुलालाही समन्स -
अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी 5 नोव्हेंबरला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे. दरम्यान ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाकडूनही ऋषिकेश देशमुखांना दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.