मुंबई - पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी भाजप आता थेट हाय कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणाची कोर्टाच्या देखरेखीखाली सखोल तपासणी केली जावी, यासाठी चित्रा वाघ यांनी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
रहस्यमय परिस्थितीत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूशी संबंधित घटनांची कोर्टाद्वारे देखरेखीखाली एसआयटी किंवा सीबीआयमार्फत एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यासाठी चित्रा वाघ यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पुण्याच्या लष्कर कोर्टात दोन याचिका दाखल-
यापूर्वीच पूजा चव्हाण प्रकरणी पुण्याच्या लष्कर कोर्टात दोन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. यामध्येही तपासाचे आदेश दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हेमंत पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हायकोर्टात याचिका केली आहे. आता थेट पक्षाकडून ही याचिका दाखल केली गेली आहे. याबाबत चित्रा वाघ म्हणाल्या, '' पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आणखी काही माहिती हाती लागली आहे. आम्ही सभागृहात सध्या या प्रकरणी आवाज उठवत आहोत.”
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.
तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
हेही वाचा-गाझियाबाद मेडिकल प्रॉडक्ट्स फॅक्टरीत भीषण आग ; 14 कामगार जखमी