मुंबई - संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यात साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता वाढवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. माझा डॉक्टर वैद्यकीय परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आरोग्य विभाग सतर्क
केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या उपचार मानकानुसार औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि हाफ़किनला सूचना दिल्या असून कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिन ३ लाखांवर गेली आहे. त्यात आरटीपीसीआर दोन लाख तर एक लाख ॲंटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांसाठी ४१० शासकीय आणि २०२ खासगी प्रयोगशाळा कार्यान्वित असून रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार रुग्ण खाटा वाढविण्यात आल्या आहेत. १ लाख २० हजार ऑक्सिजनयुक्त रुग्ण खाटा, ३६ हजार आयसीयू आणि १४ हजार व्हेंटिलेटर्स बेड्सची तयारी प्रशासनाने केली आहे.
'बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची वेळ येऊ नये'
राज्यात लसीकरणाची कामगिरी अतिशय उत्तम असून एकाच दिवशी १२ लाख लसींच्या मात्रा देऊन देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व उपस्थित फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची तसेच नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे, आवाहन कुंटे यांनी केले. गरज पडल्यास इतर राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही बाहेरून ऑक्सिजन मागविण्याची वेळ येऊ नये, यावर भर देण्यात येत असल्याचेही कुंटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
'फॅमिली डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा'
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची सुरूवातीची आणि सद्यस्थिती, दैनंदिन चाचण्यांची संख्या, रुग्णवाढीचा दर, लसीकरण, म्यूकरमायकोसिस आदींची माहिती दिली. संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी क्षमतेचा वापर करून चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असून फॅमिली डॉक्टरांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. व्यास यांनी केले.
हेही वाचा - केरळमध्ये 12 वर्षीय मुलाचा निपाह विषाणुच्या संसर्गाने मृत्यू