मुंबई - अर्थसंकल्प हा संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवून तयार करायला हवा, केवळ निवडणुकांसाठी असता कामा नये, अशी थोडक्यात पण मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.
अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचे लक्ष असते आणि सर्व थरांतील नागरिकांना त्यातून अपेक्षा असतात, केवळ काही राज्यांतील आगामी निवडणुका डोळ्यामोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प लोकांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
आगामी काळात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निवडणुका समोर ठेवून अर्थमत्र्यांनी आर्थिक तरतुदीसाठी हात जरासा ढिला सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केवळ निवडणुका डोळ्या समोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची टीका केली.
महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा- अजित पवार
आज केवळ अर्थसंकल्प मांडला गेला आहे. तो मंजूर होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवश्यक सुधारणा सुचवून महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा, महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.