मुंबई - शिवसेना सोडून थेट भाजपमध्ये गेलेले हाजी अराफत शेख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली आहे. ही भेट नाकारल्यामुळे त्यांनी आपल्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे सोपविला.
हेही वाचा... गोध्रा दंगलीप्रकरणी मोदींसह भाजप नेत्यांना क्लीन चीट
हाजी अराफत शेख हे शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष होते. तत्कालीन परिहवनमंत्री दिवाकर रावते आणि त्यांचे पटत नसल्याचे बोलले जात होते. त्यावरून मातोश्रीवर बैठकाही झाल्या होत्या. 'माझ्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याची' शेख यांची तक्रार होती. या नाराजीतून त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. याचा भाजपने फायदा घेत त्यांच्यावर अल्पसंख्याक आयोगाची जबाबदारी दिली आणि मंत्रिपदाचाही दर्जा दिला.
हेही वाचा... 'पीएसएलव्ही'ची ५० वी मोहीम यशस्वी! सर्व उपग्रह त्यांच्या कक्षेत दाखल..
आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर शेख हे संपूर्ण राज्यात फिरले आणि अनेक बैठका घेत अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर आयोगाच्या कामाचा आढावा घेणारा अहवाल त्यांना मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा होता. त्यासाठी ते गेले आठवडाभर भेटीसाठी प्रयत्न करत होते. मात्र शिवसेना सोडून गेलेल्या शेख यांना तातडीने भेट देण्याचे ठाकरे यांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शेख यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे राजीनामा सोपविला. तसेच भेट नाकारल्याबद्दल त्यांनी राजीनामा पत्रात नाराजीही व्यक्त केली. भाजप सरकारने विविध महामंडळे, आयोग यावर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय नवीन सरकार लवकरच घेणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात शेख यांचे पद जाणार होते, अशी चर्चा आहे.
हेही वाचा... पुण्यात ६७ व्या 'सवाई गंधर्व' महोत्सवाला आजपासून सुरुवात