मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. "रिक्षा पुढे मर्सिडीज चा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे" असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच चिमटे काढले होते. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात केलेल्या भाषणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्यामुळे सगळ्यांच्याच चेहर्यावर टेन्शन आले होते की, अपघात तर होणार नाही ना? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना उत्तर दिला आहे.
हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालही आपल्या भाषण उद्धव ठाकरे यांना टोले लगावले होते. आपण चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण इथपर्यंत पोहोचलो. तसेच आपल्यासोबत आलेले आमदारांनाही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते आपल्या हिमतीवर आमदार पदापर्यंत पोहोचले. आम्ही सामान्य टपरीवाले, चहा वाले, भाजीवाले आहोत, असा टोला आपल्या भाषणातून एका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
आले गेले मला फरक पडत नाही - पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "कोण आलं कोण गेलं याचा मला फरक पडत नाही. येणारे येतील जाणारे जातील ज्यांच्यात खरंच लढण्याची हिंमत असेल, जिद्द असेल त्यांनीच माझ्यासोबत थांबा. आम्ही पुन्हा एकदा नव्याने आणि जोमाने शिवसेनेला उभ करू. त्यामुळे ज्यांना लढायचं असेल त्यांनीच माझ्यासोबत राहावं" असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना केलं आहे. दरम्यान, शिवसेना भवनात पार पडलेल्या शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख, संघटक यांनी देखील आपापल्या भावना व्यक्त केल्या व आपण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं.
हेही वाचा - Assembly Speaker Election : राजकीय दबाव अन् लोकशाहीची थट्टा