मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 16 डिसेंबर रोजी मुंबईतील ताडदेव परिसरामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान एका टॅक्सी चालकाला अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक केली. कादर मोहम्मद अली शेख (38) या टॅक्सी चालकाकडून तब्बल 750 ग्रॅम चरस हे अमली पदार्थ जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत 25 लाख रुपये एवढी आहे.
आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी होत असल्याचा संशय
16 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास ताडदेव परिसरातील मुंबई सेंट्रल स्थानकाच्या जिन्याजवळ पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचला होता. त्यावेळेस कादर मोहम्मद अली शेख या टॅक्सीचालकाच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून 750 ग्रॅम चरस हे अमली पदार्थ मिळून आले.
अटक करण्यात आलेला आरोपी कादर मोहम्मद अली शेख हा गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांची खरेदी विक्री करत असून, त्याची एक मोठी टोळी सध्या परिसरामध्ये सतर्क असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.