मुंबई - भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आक्रमक झाली आहे. आज आझाद मैदानावर पुकारलेल्या धरणे आंदोलाननंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या एल्गार मोर्चाने सरकार हादरल्याचे सांगितले. तसेच सरकारविरोधात जवळपास अडीच लाख लोक रस्त्यावर उतरल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना महाविकास आघाडीच्या सावरकरांवरील भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आले. याला प्रत्युत्तर देताना, आम्हाला सावरकरांचा अभिमान आहे, त्यांना आहे की नाही, हे उद्या कळेल असे ते म्हणाले. तसेच समृद्धी महा मार्गावर बोलताना, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे. याचसोबत सरकार देखील याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
उद्या सावरकराची पुण्यतिथी आहे. यामुळे पुण्यतिथीशी संबंधित कार्यक्रम करण्याचे आवाहन कार्यकर्त्याने केल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी युनिक फाऊंडेशनचा भाजप सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेवर अहवाल प्रसिद्ध झाला होता. यामध्ये संबंधित योजनेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. तसेच जलयुक्त शिवारने कोणतेही आश्वासक काम न केल्याचा खुलासा करण्यात आला. यावर प्रत्युत्तर देताना पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या समितीचा उल्लेख केला. उच्च न्यायालयाच्या या समितीने जलयुक्त शिवार योजनेतून समाधानकारक कामे झाल्याचे नमूद केले होते.