मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आमचे मित्र आहेत. संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपये मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, संजय राऊत यांनी मानहानीची सव्वा रुपये असलेली रक्कम वाढवावी. कारण संजय राऊत यांची सव्वा रुपये एवढी किंमत नक्कीच नाही, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला आहे.
हेही वाचा - पोलिसांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे - किरीट सोमैया
राज्यसभेवरील एका जागेसाठी भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा चिमटा काढला. भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकांना चिमटे काढले जातात. मात्र, चिमटा काढल्याने जखम होऊ नये याची काळजी मी नेहमीच घेतो, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
- सातत्याने बोलणारे म्हणून संजय राऊत यांना अवॉर्ड -
खासदार संजय राऊत हे सातत्याने रोज बोलत असतात. रोज सकाळी ते माध्यमांशी संवाद साधतात. त्यामुळे शिवसेनेत इतर कोणी बोलणार आहे किंवा नाही हा प्रश्न उपस्थित होतो. अगदी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना देखील ते बोलत होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेचा अंदाज आपण घेऊ शकतो. त्यांच्या या क्षमतेमुळे संजय राऊत यांना 'सातत्याने बोलणारे' असा अवॉर्ड दिला पाहिजे, असाही चिमटा चंद्रकांत पाटलांनी काढला.
हेही वाचा - 'त्या' वक्तव्यावरुन रुपाली चाकणकरांची प्रविण दरेकरांविरोधात तक्रार दाखल