मुंबई - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. नामांतराच्या प्रस्तावावरून राजकीय वाद रंगला असताना त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यास रामदास आठवले यांनी विरोध दर्शविला असून नाव बदलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आठवले यांनी दिला आहे.
काय आहे वाद -
औरंगाबाद जिल्ह्याचे आणि शहराचे नाव औरंगजेबाच्या नावाने असल्याने हे नाव संभाजीनगर असे बदलले जावे, अशी मागणी केली जात आहे. गेली तीन दशके नाव बदल करावा, अशी मागणी केली जात आहे. गेल्या तीन दशकात हे नाव बदलण्यात आलेले नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून त्यामधील शिवसेनेने संभाजीनगर नाव करण्यास पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाव बदलण्यास पाठिंबा दिला आहे. मात्र आघाडीमधील काँग्रेसने नाव बदलण्यास विरोध दर्शविला आहे. नाव बदलून विकास होत नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे.
शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका आल्याने हा मुद्दा पुढे केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करताना सरकारला आणि विशेष करून शिवसेनेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
आरपीआयची वादात उडी -
राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी मधील पक्षांमध्ये नामांतरावरून वाद सुरू आहे. त्यात आता आरपीआयने उडी मारली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबाद हे नाव जुने आहे. हे नाव बदलू नये. नाव बदलल्यास आरपीआय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.