मुंबई - कोविड काळात प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दर (Railway Platform Ticket Price) वाढवण्यात आले होते. दहा रुपयांवरून थेट पन्नास रुपये दर करण्यात आले होते. प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी कमी करण्याचा हेतूने रेल्वेने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोविड संसर्ग कमी झाल्यामुळे वाढवलेले प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
आता पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) दहा रुपयाला प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. याबाबतची अधिसूचना रेल्वेकडून जारी करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल आणि कल्याण या मध्य रेल्वेवरील या सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट आता प्रवासासाठी 10 रुपयात उपलब्ध होणार आहे. आजपासून सर्व या स्थानकावर प्रवाशांना 10 रुपयात तिकीट उपलब्ध होणार असल्याची अधिसूचना रेल्वेकडून काढण्यात आली आहे.