ठाणे - मागील ७० वर्षांपासून रेल्वे रुळांच्या लगत राहणाऱ्या कळव्यातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाने घरे खाली करण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिला ( Central Railway Notice Kalwa People ) आहे. त्यामुळे रेल्वे रुळालगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर, या नागरिकांची पर्यायी व्यवस्था करा अन्यथा आम्ही यांच्यासोबत उभे राहू. तसेच, प्रशासनाचा मनमानी कारभार चालू देणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad On Central Railway ) यांनी दिला आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात ५० वर्षापेक्षा अधिक काळापासून रेल्वे रुळालगत अनेक नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहे. या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने सात दिवसांत घरे खाली करा, अशी नोटिस देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad Tweet On Central Railway ) म्हणाले की, "अनेक वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांना ७ दिवसात घरे खाली करण्याची नोटीस देणे हे माणुसकीला धरून नाही. संपूर्ण मुंबई परिसरात रेल्वे रुळाच्या लागत १५-२० फुटांवर लाखो लोक राहतात. या रहिवाशांचे पुनर्वसन करा, पर्यायी जागा द्या अन्यथा त्या गरीब लोकांच्या मागे आम्ही उभे राहू. रेल्वे प्रशासनाची मनमानी कारभार चालू देणार नाही," असा इशाराही आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
हेही वाचा - मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यास पगारी रजा द्या- भाजपची आयुक्तांकडे मागणी