मुंबई - मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणजे दादर रेल्वे स्थानक आहे. स्थानकाच्या पूर्वेकडे पादचारी पुलाशेजारी असलेल्या ७० वर्ष जुने हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. हे मंदिर बेकायदेशीर असल्याने तत्काळ हटवण्याची गरज आहे. मध्य रेल्वेने यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम मंदिर प्रशासनाला दिला आहे. रेल्वेच्या या नोटीसमुळे भाजपा शिवसेना आता आमनेसामने आली आहे.
मंदिरावरून वाद पेटणार..?
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांपैकी दादर स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकाला मध्य आणि पश्चिम रेल्वेची जोडणी आहे. मुंबई-पुणे जाणाऱ्या खासगी बस आणि राज्य परिवहनच्या गाड्यांचा अधिकृत थांबा स्थानकापासून जवळ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्थानकांवर गर्दी असते. स्थानकाच्या पूर्वेकडे पादचारी पुलाशेजारी असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर हनुमान मंदिर हे रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. या मंदिरामुळे प्रवाशांच्या वर्दळीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच रेल्वे स्थानकाशेजारी विकासकामे करण्यासाठी मंदिरामुळे अडथळे येत आहे. रेल्वेने याआधीही हे मंदिर बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. आता ही नोटीस मिळाल्यानंतर पुढील ७ दिवसांत या मंदिराची जागा रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावी. अन्यथा रेल्वे प्रशासन बळाचा वापर करून मंदिर हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रेल्वेच्या या नोटीसवरून वाद पेटणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
'रेल्वे प्रशासन भावना शून्य'
दादरच्या हनुमान मंदिर विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी सांगितले की, ७० वर्षांपासून हे मंदिर उभे आहे. या मंदिरांशी भक्तांच्या भावना जोडल्या आहेत. मात्र, विकासाच्या नावावर मंदिर तोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पडतो. रेल्वे प्रशासन याठिकाणी आलिशान माॅल्स, दुकाने उभे करणार आहे. त्यामुळे या सुविधेचा फायदा स्थानिकांसाठी किंवा प्रवाशांसाठी होणार नसून तो मोठमोठे उद्योजक, रेल्वे प्रशासनाला होणार आहे. या मंदिरात फक्त स्थानिक रहिवासी येत नसून टाटा, केईएम, वाडिया, अल्पोला या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी परिक्षेच्या वेळी दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन भावना शून्य होऊन नोटीस बजावत आहे, असेही कारखानीस म्हणाले.
शिवसेनेकडून आंदोलन
हनुमान मंदिराला बेकायदेशीर नोटीस बजावल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले. केंद्र सरकारची मंदीरांबाबत दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे राममंदीर बांधण्याबाबत आक्रोश करायचा. दुसरीकडे रामाचा दूत हनुमान यांचे मंदिर तोडण्यासाठी नोटीसा बजावायच्या. हे मंदिर ७० वर्ष जुनं आहे. या परिसरातल्याच नाहीतर येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला धक्का लागून देणार नाही. मानवी साखळी पकडून आंदोलन केले आहे. मात्र यातून मार्ग निघाला नाही, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी दिला आहे.
हेही वाचा - Ganeshotsav2021: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न