मुंबई - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत लॉकडाऊनच्या काळात बेकायदा पद्धतीने खासगी कामांसाठी विमान प्रवास केल्याचे उघड झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केली होती. केंद्रातून या सगळ्या प्रकरणावर चौकशीसुद्धा केली जाणार आहे. त्या चौकशीची नोटीस देखील ऊर्जा मंत्र्यांना मिळाली असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला आहे.
हेही वाचा - आश्चर्य! आईने घेतली लस तर कोरोना अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म
मंत्र्यांच्या खासगी कामासाठी ऊर्जा खात्याकडे पैसे आहेत कसे?
विश्वास पाठक यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई, नागपूर, दिल्ली असा विमानप्रवास केल्याची माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीत "महानिर्मिती" कंपनीने मान्य केले आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसांचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणाला आपल्या मंत्र्यांच्या खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च करण्यासाठी मात्र पैसा आहे ही आश्चर्यजनक बाब असल्याचे पाठक यांनी सांगितले.
नितीन राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत हा विमान प्रवास केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, तसेच त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी, अशी मागणी विश्वास पाठक यांनी केली आहे. यासंदर्भातली दखल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेतली आहे. केंद्रीय ऊर्जा खात्याकडून या सगळ्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. तसेच त्याचे पत्र देखील नितीन राऊत यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिली.
हेही वाचा - फास्ट टॅग नसणारी वाहने बेकायदेशीर म्हणायची का? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल