मुंबई - सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने बारावी निकालाच्या मूल्यमापनाची पद्धत जाहीर केली आहे. त्यामुळे 30:30:40 पद्धतीनं मूल्यमापन होणार आहे.
- सीबीएसईच्या 30:30:40 फॉर्म्युल्यानुसार राज्यातील एचएससी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन -
केंद्र सरकारने सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शिक्षण विभागानेही एचएससी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे दिला. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एचएससी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने एचएससी विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचा फॉर्म्युला आज जाहीर केला आहे. सीबीएसई बारावीच्या 30:30:40 फॉर्म्युल्यानुसार राज्यातील एचएससी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे.
- CBSE बारावीचा फॉर्म्युला आहे तरी काय?
सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे. यात दहावीच्या परीक्षेचे 30 टक्के गुण, अकरावीमधील 30 टक्के गुण आणि बारावीतील 40 टक्के गुणांचा समावेश असणार आहे. दहावी आणि अकरावी या दोन वर्गातील वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्या तीन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले आहेत त्याच्या आधारे अंतिम गुण दिले जातील. बारावीच्या वर्षातील युनिट टेस्ट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.
- शिक्षकांची होणार दमछाक -
बारावीचे मूल्यमापन करण्यासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 30:30:40 फॉर्म्युला तयार केला आहे. केंद्राच्या या कार्यपद्धतीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना तर दिलासा मिळाला आहे. मात्र, निकाल लावण्यासाठी शिक्षकांची मोठी दमछाक होणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
- याबद्दल शिक्षणतज्ज्ञांचे मत वाचा खालील लिंकवर -
बारावी निकाल लावण्यासाठी शिक्षकांची होणार दमछाक - शिक्षणतज्ज्ञ