मुंबई - राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयकडून यासंदर्भात अद्याप स्पष्टीकरण देण्यात आल्याचे नसल्याचे समजते.
सीबीआयकडून स्पष्टीकरण नाही -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून देखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्या तपासाचा एक भाग म्हणून आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते. सीबीआयने यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयकडून कुंटे आणि पांडे यांना समन्स बजावले जाणार आहेत. यामध्ये दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे जायचे, याबाबतची सविस्तर माहिती असेल.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा -
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे नक्की कोणत्या कारणास्तव दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा केली होती. आता दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआय कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. मात्र सीबीआय कार्यालयात जाण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे समजते.