मुंबई - तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांची वसुलीचा आरोप करणाऱ्या तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त व सध्याचे राज्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. तसेच अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता.
हेही वाचा - आम्ही लोकशाही मानतो.. देशमुखांनी घेतलेला निर्णय योग्य - जयंत पाटील
'मागवली तक्रारीची प्रत'
मुंबईत सीबीआयचे पथक दिल्लीहून दाखल होत असून या पथकाकडून आता या प्रकरणातील तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या मलबार हिल पोलीस ठाण्याकडे दिलेल्या तक्रारीची प्रत मागवली आहे. याबरोबरच सीबीआयकडून परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनिल देशमुख यांच्या संदर्भातील तक्रार करणार जे पत्र लिहिले होते ते पत्रसुद्धा मागवले असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
'सहकार्य राहील'
याबरोबरच सीबीआयचे आणखी एक पथक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळवण्यासाठी कामाला लागलेली असून मंगळवारी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी साठी राज्य सरकारचे सर्व प्रकारे सहकार्य राहील, असे म्हटले आहे.