मुंबई - सिनेसृष्टीमध्ये करिअर करू पाहत असलेल्या नवोदित सिनेअभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच असेच एक प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समोर आणलं होतं. या प्रकरणात अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या आरोपींवर कमजोर कलम लावली आहे. त्यातून त्यांना जामीन मिळू शकतो. जर ही आरोपी बाहेर आले हातपाय तोडून असा इशारा मनसेने दिला. आज यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे आणि मनचिसेकडे तक्रार करणाऱ्या नवोदित अभिनेत्रीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
एका मुलीला तिवारी आणि यादव नावाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटांमध्ये काम देतो असं सांगितले. या दोघांसाठी कास्टींगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी या मुलीला तुला निर्मात्यांना खूष करावे लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर या मुलीला एक फोन आला त्यामध्ये तिला सांगितलं की तुला ठाण्यामधील एका हॉटेलमध्ये यायचे आहे. जिथे आम्हा दोघांबरोबरच आमचा एक मित्रही असेल. आमचा मित्र लखनऊवरुन येणार असून तुला रात्रभर त्या हॉटेलमध्ये आम्हा तिघांसोबत थांबावे लागेल, असं या तरुणीला सांगण्यात आलं. ही माहिती या मुलीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर या निर्मात्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी जाळे टाकण्यात आले व या मुलीसोबत मनसेचे कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन निर्मात्यांना चांगलाच चोप दिला.
निर्माता राहुल यादवचा मला फोन आला. त्याने सांगितले निर्मात्याला तुझे फोटो आवडले आहेत. तुला लीड रोल हवा असेल तर त्यांना खुश करावे लागेल. त्यांनतर मला त्याने बरेच कॉल केले. मला त्यांनी हॉटेलला बोलावले. याबद्दल मी मनसेकडे तक्रार केली. मी या निर्मात्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला बंदुक दाखवली. मला त्यांनी तीन ते साडे तीन तास गाडीतून फिरवले. मनसेची टीम या दरम्यान माझ्या संपर्कात होती. मला त्यांनी दारू पिणार का, असे विचारले. त्यांनी दारूचे ग्लास घेतले. मला फिरवल्यानंतर मला त्यांनी एका फार्महाऊसवर नेले. त्यानंतर मनसेची टीम या ठिकाणी पोहचली आणि या लोकांना धडा शिकवला. या प्रकारात पोलिसांनी आम्हाला उलट-सुलट प्रश्न विचारले. आम्ही पीडित आहोत आणि आम्हाला पोलिसांनी त्रास दिला. पोलिसांनी आम्हाला सेटलमेंट करणार का ? असे विचारल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. या अभिनेत्रीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
जामीन मिळाला की त्यांचे हातपाय तोडू -
आम्ही अशा लोकांचे हातपाय तोडणार असं म्हणलं की लोक आम्हाला प्रश्न विचारतात. आता या निर्मात्यांना अटक झाली आहे. त्यांना जामीन मिळाला की त्यांचे हातपाय तोडणार, यांची दादागिरी चालू देणार नाही. या परप्रातीयांनी मुंबईतून निघून जावे. पोलिसांनी या निर्मात्यांवर कमजोर कलम लावली आहेत. कुठल्याही अभिनेत्रीला असा त्रास असेल तर त्यांनी मनसेकडे संपर्क करावा, असे आवाहन मनसे नेते अमेय खोपकर यांनी केले आहे.