मुंबई - भारतीय जनता पक्षाला दूर सारून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्या निर्णयाचा मोठा फटका पक्षाला बसलेला आहे. आज पक्षात उभी फूट पडलेली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदार घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. एकनाथ शिंदे यांनी शेवटी महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली खुर्ची सोडावी लागली.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवण्याचा घाट घातला - उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षात सोबत असलेली नैसर्गिक युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत केलेली युती योग्य नसल्याचे बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे. सत्तेत एकत्र असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवण्याचा घाट घातला होता असा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जातोय. त्यामुळेच आपण वेगळी वाट धरत असल्याचे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांनी सांगितले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने शिवसेनाला फटका - राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जुळत नसल्यानेच 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र, या दोन्ही पक्षासोबत गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार पक्षनेतृत्वावर नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde,) यांच्यासह चाळीस आमदारांनी पक्षाच्या विरोधात बंड केले. त्याचा खूप मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. मात्र, अद्यापही भारतीय जनता पक्षाची उद्धव ठाकरे यांनी जवळीक साधली नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबियांना कशा प्रकारे त्रास दिला होता. हे सातत्याने आताही उद्धव ठाकरे सांगत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सोबत आपण जाऊ शकत नाही असे उद्धव ठाकरे यांनी एवढ्या मोठ्या बंडानंतरही स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे तात्काळ निर्णय घेणार नाहीत - सध्याची सगळी परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करणे हे उद्धव ठाकरे यांना सध्या तरी महाग पडल्याचे दिसत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांनी व्यक्त केल आहे. मात्र, अद्यापही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत महाविकासआघाडी तोडल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलेली नाही. पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबतच जाणार का? याबाबत अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा मग 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरे तात्काळ निर्णय घेणार नाहीत असेही प्रवीण पुरो म्हणाले आहेत.
शरद पवारांची उद्धव ठाकरेंना साद - शिवसेना पक्षात झालेल्या एवढ्या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व लक्ष पक्षबांधणीकडे केंद्रित केल आहे. सातत्याने पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नेते जिल्हाधिकारी तालुकाप्रमुख शाखा प्रमुख यांच्याशी उद्धव ठाकरे संपर्क साधत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित या निवडणूक लढवण्यास राज्यामध्ये चित्र वेगळे निर्माण होईल अशी संकेतही शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 जुलैच्या कार्यकारणीच्या बैठकीत दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा - एनडीएच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला. त्यानंतर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र, हा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला नसून राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी समाजातील महिलेला देण्यात आला असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून असलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्ष सोबत उद्धव ठाकरे यांना चर्चेची दारं खुली झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याकडून नाराजी व्यक्त - सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर, उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधणार नाहीत असे मत प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे. मात्र, यासोबतच द्रौपदी मुर्मु यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे राज्यातील काँग्रेस त्यांच्यावर नाराज झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा - Booster Dose: करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय