मुंबई - जगभरात कोरोना विषाणूचा कहर वाढला असताना महाराष्ट्रात कोरोनाचे 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून आज (मंगळवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकल, मेट्रो, बेस्ट यांच्या बंदीबाबत विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा... राज्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही - राजेश टोपे
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा बंद करणार आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे यांनी, 'लोकल आणि मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय माझ्या विभागाच्या अधिकारात येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे. परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील. तूर्तास कमीत कमी गर्दी लोकलमध्ये असावी, याकडे लक्ष देत आहोत. त्याचबरोबर लोकलची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत' अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात उपद्रव करणाऱ्या करोना संसर्गाला थांबवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. यासंदर्भात सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. कोरोनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्या बैठकीला जाण्यापूर्वी टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'राज्यातील करोना बाधितांचा आकडा स्थिर आहे. सध्या राज्यात ३९ करोनाबाधित रुग्ण आहेत. सध्या करोनाचा संसर्ग रोखण्याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी. खासगी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना द्याव्या' असे आवाहन त्यांनी केले आहे.