मुंबई - कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना, मुंबई महापालिकेचे भायखळा येथील रिचर्डसन क्रुड्स कोविड सेंटर कोविड ग्रस्तांसाठी आशेचा किरण बनला आहे. मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून प्रतिदिन तीनशेहून अधिक रुग्ण येथे दाखल होत आहेत. या सर्व रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची व्यवस्था येथे उभारल्याची माहिती कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. कुमार डुसा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. वाढता प्रसार आणि प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही पालिकेने ताब्यात घेतली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ते देखील कमी पडू लागले. वरळी, बिकेसी, नेस्को, मुलुंड, दहिसर आणि भायखळ्यातील रिचर्डसन क्रुड्स येथे जंबो कोविड सेंटर उभारले होते. शेड वन आणि शेड टू असे दोन भाग केले असून महिला आणि पुरुष असे गट करण्यात आले आहेत. सुरुवातीला येथे तीनशे बेड्स होते. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता ७०० बेड्स राखीव ठेवले होते. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आणि येथील सर्व प्रवाशांचा क्वॉरंटाईन कालावधी संपुष्टात आल्यानंतर हा विभाग पूर्णतः रिकामा केला असून येथे १ हजार खाटांचे जंबो कोविड सेंटर तयार केले आहे. अत्यावश्यक सेवासुविधा, व्हेंटिलेटर, स्पेशालिस्ट डॉक्टर, रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका, तात्काळ चाचणीसाठी यंत्रणा येथे कार्यान्वित केली आहे. मुंबईसह महामुंबई प्रदेशातून रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत आहेत, असे कोविड सेंटरचे अधिष्टाता डॉ. कुमार डुसा यांनी सांगितले.
कोविड सेंटरमध्ये २५ डॉक्टर, २० नर्सेस, ३१ वॉर्डबॉय, ५ रुग्णवाहिका आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे कर्मचारी वर्गावर ताण येत आहे. महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार लवकरच रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे डॉ. डुसा यांनी सांगितले.
प्रतिदिन ३० ते ४० पॉझिटिव्ह रुग्ण -
सध्या तीनशे रुग्ण येथे उपचार्थ दाखल आहेत. २३० पुरुष आणि ७० महिलांचा त्यात समावेश आहे. पैकी २५ रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आला आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये लक्षणे असून त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. दिवसाला दीडशेहून अधिक जण चाचणीसाठी येतात. दरम्यान, ३० ते ४० पॉझिटिव्ह आढळून येतात. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी शेड वन, शेड टू कोविड सेंटर सुरू आहे. तेथे संबंधितांवर उपाचार केले जात आहेत, असे डॉ. पूजा नलावडे यांनी सांगितले.