मुंबई - मुंबईतील गेले दीड वर्ष सुरू असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. गेले 9 महिने मुंबईत लसीकरण मोहीम सुरू असून 97 टक्के नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. येत्या दिवाळी पर्यंत मुंबईमधील 100 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण होईल. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 100 टक्के नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
जानेवारीत 100 टक्के लसीकरण -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या 9 महिन्यात 97 टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर 58 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या होत असलेल्या लसीकरणानुसार दिवाळीपूर्वी 100 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देऊन पूर्ण होईल. ऑक्टोबर अखेरीस लसीकरण झालेल्या नागरिकांना 84 दिवसांनी म्हणजेच जानेवारी महिन्यात लसीचा दुसरा डोस दिला जाईल. यामुळे जानेवारी महिन्यात 100 टक्के नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस देऊन पूर्ण झालेले असतील अशी माहिती काकाणी यांनी दिली.
हेही वाचा - मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये बोनस, उद्या घोषणेची शक्यता
असे झाले लसीकरण -
मुंबईत आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 26 हजार 968 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 87 लाख 60 लाख 60 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 51 लाख 66 हजार 908 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोव्हीशिल्डचे 1 कोटी 25 लाख 34 हजार 264, कोवॅक्सिंनचे 13 लाख 39 हजार 302, स्फुटनिक व्हीचे 53 हजार 402 डोस देण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. १ मार्चपासून ६० वर्षावरील वयोवृद्ध तसेच ४५ ते ५९ वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. १ मे पासून १८ ते ४५ वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले असले तरी राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३० ते ४४ वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता, गरोदर महिला, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, महिला आदींचे लसीकरण केले जात आहे.
हेही वाचा - Drug Case : आर्यन खानच्या जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी; वाचा, आज न्यायालयात काय घडलं?