मुंबई - बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावालाचा उपचारादरम्यान जे जे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी युसूप लकडावालाला अटक केली होती. ईओडब्ल्यू प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनंतर लकडावालाला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 'ईडी'नेही अटक केली होती. मागच्या अनेक दिवसांपासून लकडावाला कॅन्सरने ग्रस्त होता. अखेर त्याचा आज (गुरूवार) उपचारादरम्यान जेजे रुग्णालयात मृत्यू झाला.
लंडनमध्ये पळून जाताना केली झाली होती अटक -
2019मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.
हैद्राबादच्या नवाबाची केली फसवणूक -
पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथे हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कथीत मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. ही जमीन 50 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जाते. मात्र, लकडावाला यांने जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे 11.5 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार सर्व्हे नंबर 104 (सीटीएस नंबर 11, 11A, 11B) वरील जागा 4 एकर आणि 38 गुंठ्यांची आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त, एसीबी न्यायालयाची क्लीनचीट