मुंबई- आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या या दौऱ्यात मुंबईतील उद्योगपतींची भेट घेऊन, त्यांचे अर्थसंकल्पाबाबतचे मत जाणून घेतले. दादरच्या योगी सभागृहात "सर्वस्पर्शी अर्थसंकल्प" हा कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला आयएलसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार, बीएससीचे सीईओ आशिषकुमार चौहान यांच्यासह खासदार गोलाप शेट्टी, मनोज कोटक, आमदार मंगल प्रभात लोढा, यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांनी अर्थसंकल्पबाबत आपली मते मांडली. दरम्यान यावेळी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यावेळेचा अर्थसंकल्प नक्कीच आव्हानात्मक असून, या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कोरोनाचा सर्वांनाच फटका बसला आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कोणताही टॅक्स वाढवू नये असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले होते. सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
देशाला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प
देशाला आत्मनिर्भर बनवणारा हा अर्थसंकल्प असून, देशाची दिशा बदलणार हा अर्थसंकल्प असल्याचा दावाही यावेळी निर्मला सीतारामन यांनी केला आहे. दरम्यान अर्थसंकल्पात छुप्या मार्गाने जनतेवर कर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर देखील निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेवर कोणताही छुपा करत लावण्यात आलेला नाही, जे असा आरोप करत आहेत त्यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्प पाहावा असंही त्यांनी यावेळी म्हटले.