मुंबई - घराबाहेर पडू न शकलेल्या किती नागरिकांना घरोघरी जाऊन महापालिकेने लस दिली याबाबतची विचारणा आज उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला केली. याबाबत महापालिकेने गुरुवारपर्यंत न्यायालयात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.
अंथरुणाला खिळलेल्या, घराबाहेर पडू न शकणार्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम पालिकेकडून सुरू आहे. मोहीम सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत 4715 जणांनी नोंदणी केली होती. या नोंदणीनुसार आत्तापर्यंत 602 लाभार्थ्यांना घरी जाऊन लस दिल्याचे मुंबई महापालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आले. ही सुनावणी न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर पार पडली.