मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र याचा गैरफायदा काही खासगी संस्था आणि रुग्णालयांकडून घेतला जात आहे. कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नियुक्त केली आहे. याप्रकरणी ४८ तासात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
नेमके काय घडले -
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये 30 मे रोजी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या लसीकरण मोहिमेमध्ये 390 नागरिकांनी सहभाग घेतला होता. मात्र, लसीकरणानंतर अवघ्या चार तासांत मिळणारे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. लस घेतल्यानंतर रहिवाशांना ताप, अंग दुखी यासारखे परिणामही दिसून आलेले नाहीत. यामुळे रहिवाशांनी लसीकरणाबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. जर पोलिसांनी केली नाही तर सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार योगेश सागर यांनी केली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.
खासगी केंद्रांना मोकळीक -
कांदिवली येथील बोगस लसीकरणाची माहिती मिळताच महापालिकेने उपायुक्त शंकरवार यांची समिती नियुक्ती केली आहे. कांदिवली प्रकरणाची सखोल चौकशी करून ते येत्या ४८ तासात त्याचा अहवाल सादर करतील. असे प्रकार पुढे घडू नये यासाठी व खासगी केंद्रांवर अंकुश राहावा यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेचा अंकुश ठेवा असे सांगत होतो. मात्र खासगी रुग्णालयांना मोकळीक देण्यात आल्याने ते काय करतात याची माहिती पालिका आणि राज्य सरकारला देत नाहीत. यामुळेच असे प्रकार घडतात. खासगी लसीकरण केंद्र काय करतात, याची माहिती महापालिका आणि राज्य सरकारला द्यायलाच पाहिजे असे महापौर म्हणाल्या.