मुंबई - कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापासूनच पालिका प्रशासनाने नागरिकांना मास्क घालण्यासाठी आवाहन केले. यावेळी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करत 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता ही दंडाची रक्कम 200 रुपये करण्यात आली आहे.
मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी सहा महिन्यांत 1 लाख 63 हजार 115 वर आली. तर, मृतांचा आकडा 8 हजार 20 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने सुरक्षित अंतर, मास्क लावणे, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुण्याचे आवाहन केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे देखील सक्तीचे करण्यात आले. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याने कडक कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
यामुळे पालिकेने मास्क न लावणाऱ्यांकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या 5 महिन्यात 2 हजार 798 मुंबईकरांवर पालिकेने कारवाई करत 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच 'फेसमास्क' योग्यरित्या न लावणा-या 9 हजार 954 व्यक्तींना समज म्हणजेच वॉर्निंग देण्यात आली.
मुंबईत अनलाॅकची अंमलबजावणी सुरू झाल्याने आता मुंबई पूर्वपदावर येत आहे. त्यात तोंडावर मास्क न लावणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड आकारत असल्याने लोकांमध्ये पालिकेविषयी गैरसमज पसरत होता. लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई म्हणून फक्त 200 रुपये वसूल करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक यमगर यांनी दिली.
देवस्थानं लवकरच उघडणार
मुंबई अनलाॅकच्या दिशेने वाटचाल करत असून अनेक नियम शिथिल करण्यात आले आहे. मुंबईमधील मंदिरे उघडण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने निर्णय घेतल्यावर मुंबईतही मंदिरे उघडली जातील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.