मुंबई - मुलुंड पूर्व-पश्चिम येथे नागरिकांना ये-जा करण्यासाठी भूयारी मार्ग बांधला जाणार होता. मात्र हा भूयारी मार्ग बांधण्याचा विचार पालिकेने रद्द केला आहे. त्या जागी आता पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल ओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या आधीच्या दोन उड्डाणपुलांपाठोपाठ आता हा आणखी एक तिसरा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या पुलामुळे मुलुंडमधील मिठागर व नाहूर परिसरातील नागरिकांची समस्या आता दूर होणार आहे.
मुलुंडकरांची मागणी मान्य -
मुलुंडच्या दोन टोकांना जोडणारे दोन उड्डाणपूल आहेत. हे पूल पूर्व आणि पश्चिमेला ते जोडलेले आहेत. त्यामुळे या पुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन ते चार किमी अंतर कापावे लागते. मुलुंडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मध्यभागी आणखी एका पर्याय असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मुलुंडच्या रहिवाशांकडून केली जात होती. पालिकेने त्यावर येथे भुयारी मार्ग उभारून देण्याची तयारी दर्शवली होती. विकास आराखड्यात यासाठी तरतूद देखील करण्यात आली आहे. पुलाचा बांधकाम खर्च आणि डिझाईन यावर पालिकेचा पूल विभागाने अभ्यास सुरू केला आहे.
भूयारी मार्ग ऐवजी उड्डाणपूल -
भूयारी मार्ग ऐवजी उड्डाणपूल बांधल्यास नागरिक आणि वाहनचालक या दोघांचाही फायदा होणार असल्याचा पर्याय काहींनी पालिकेला सूचवला होता. मुंबईत अनेक भूयारी मार्गात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात हे मार्ग उपयुक्त ठरत नाहीत, याकडेही लक्ष वेधले होते. पालिकेने ही सूचना मान्य करीत उड्डाणपूल उभारणीची तयारी दर्शवली आहे. या पुलाला तांत्रिक सल्लागार समितीने (टॅक) मंजुरी दिली आहे, अशी माहिती येथील भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली.
पूल पूर्वद्रुतगती मार्गाला जोडणार -
हा उड्डाण पूल अपना बाजार येथील पुलाजवळून जाणार असून पूर्वेकडील नाणेपाडा आणि पश्चिमेकडील जवाहरलाल नेहरू मार्गाला तसेच पूर्वद्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. पुढील आठवड्यात या पुलाच्या बांधकामांबाबत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.