मुंबई : शहरात गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत, नागरिकांनी सहकार्य केले नाही, आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर अंशतः लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मात्र चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाचे प्रमाण कमी असल्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नसल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी मुंबईकरांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
कंटेन्टमेंट झोनची कडक अंमलबजावणी..
मुंबईत गेले अकरा महिने कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यावर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत अंशतः लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला होता. याबाबत काकाणी बोलत होते. मुंबईत जे रुग्ण आढळून येत आहेत, ते इमारतींमधील रुग्ण आहेत आणि ते विखुरलेले आहेत. एकाच ठिकाणी रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी 97 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले (असिम्प्टोमॅटिक) आहेत. मुंबईमधील कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिक्त आहेत. त्यात वेंटीलेटर, आयसीयू उपलब्ध आहेत. ही व्यवस्था पुरेशी आहे. रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात इमारती आणि चाळी सील केल्या आहेत. एकाच ठिकाणी रुग्णसंख्या वाढली तर कंटेन्टमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी पालिकेने तयारी ठेवली आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
तर अंशतः लॉकडाऊन..
मुंबईत चाचण्या वाढवल्याने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत बाजारपेठा, लोकल, विवाहसमारंभ अनेक व्यवहार सुरु झाले आहेत. तेथील गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईकरांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली तर रुग्णसंख्या वाढणार नाही. मात्र मुंबईकरांनी नियमांचे पालन केले नाही आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मात्र रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात अंशतः लॉकडाऊन लावावा लागू शकतो असा इशारा काकाणी यांनी दिला आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी..
मुंबईत काल सोमवारपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 34 हजार 572 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 504 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 11 हजार 407 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 225 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 34 हजार 610 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंतचे लसीकरण..
मुंबईत 16 जानेवारीपासून आतापर्यंत 3 लाख 90 हजार 938 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 1 लाख 62 हजार 598 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 11 हजार 78 फ्रंटलाईन वर्कर, 1 लाख 5 हजार 867 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वयातील गंभीर आजार असलेल्या 11 हजार 395 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
हेही वाचा : मनसुख हिरेन प्रकरणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर..